मुंबई : आपली सत्ता असलेल्या राज्यात दिलेली आश्वासने पूर्ण न करताच काँग्रेस नेते महाराष्ट्रात येऊन मात्र आपल्या कामगिरीची खोटी माहिती देत असल्याची जोरदार टीका आंध्र प्रदेशचे आरोग्य, कुटुंब आणि कल्याण मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय सचिव सत्य कुमार यादव यांनी रविवारी केली. भाजपाप्रणीत सरकार असलेल्या राज्यांमध्ये लोकाभिमुख कारभार होत आहे. मात्र ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आहेत त्या राज्यांमध्ये लुटलेला पैसा येथे आणून खर्च केला जात असल्याचा आरोप करीत यादव यांनी काँग्रेसचे सरकार असलेल्या तेलंगणा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सरकार असलेल्या आंध्र प्रदेशच्या कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेतला. भाजपा मीडिया सेंटरमधील पत्रकार परिषदेत यादव बोलत होते. भाजपाचे माध्यम विभाग राष्ट्रीय सहप्रभारी संजय मयुख, भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल,आंध्र प्रदेशचे भाजपा सरचिटणीस विष्णूजी, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आणि पंकज मोदी यावेळी उपस्थित होते.
यादव यांनी सांगितले की, तेलंगणा आणि कर्नाटकमधून काँग्रेस नेते येथे येत आहेत. खोटे बोलून ते तिथे सत्तेत आल्यावर जी आश्वासने त्यांनी दिली होती ती पुर्ण केली नाहीत. पण महाराष्ट्रात येऊन त्यांच्या राज्यात त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचे रेटून सांगत आहेत. एक वर्षापूर्वी तेलंगणात काँग्रेस सरकार तर सहा महिन्यापूर्वी आंध्र प्रदेशात भाजप आणि तेलगू देशमप्रणीत सरकार सत्तेत आले. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी येथे येऊन खोटे बोलून गेले. ज्येष्ठ नागरिकांसाठी चार हजार पेन्शन करू बोलले. पण एक वर्ष उलटले तरी अद्याप पाहणीच सुरू आहे. एकाही ज्येष्ठ नागरिकाला पेन्शन मिळालेले नाही.
या उलट आंध्र प्रदेशात आमच्या सरकारने निवृत्ती वेतन रक्कम तीन हजार वरून चार हजार रु. करण्याचा शब्द दिला होता. सत्तेत आल्यानंतर पहिल्याच महिन्यात निवृत्ती वेतन रक्कम चार हजार करण्यात आली. दिव्यागांचे पेन्शन तीनचे सहा हजार करण्यात आले. अर्धांग वायू असलेल्यांचे पेन्शन पाचवरून पंधरा हजार केले. तेलंगणात हे का होऊ शकले नाही हे रेवंत रेड्डी यांनी सांगावे, असे आव्हान यादव यांनी दिले. पाचशे रुपयात सिलिंडर देऊ हा त्यांचा दूसरा वादा होता एक वर्ष उलटले आजही पाहणी सुरू आहे. आंध्र प्रदेशात तीन सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. एक कोटी 55 लाख लोकांना पहिला मोफत सिलिंडर मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा देऊ म्हणाले होते पण आजतागायत तो काही मिळालेला नाही. एकाही नेटवर्क हॉस्पिटलला पैसे न दिल्याने तेथे रुग्णांवर उपचारच होत नसल्याचे श्री. यादव यांनी निदर्शनास आणले. अशा अनेक फसव्या आश्वासनांची अनेक उदाहरणे देवून या आश्वासनांना बळी न पाडण्याचे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले. युवकांसाठी पाच लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तेलंगणात देण्यात आले होते. एक वर्ष उलटले तरी तेथे एकही युवकाला नोकरी दिलेली नाही. ना जॉब कार्ड मिळाले ना तिथे गुंतवणूक आली. उलट आंध्र प्रदेशात आमचे सरकार येताच 17 हजार नोकर भरती केली गेली आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही आली.