ओटावा : कॅनडातील टोरंटो विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाला आहे. डेल्टा एअरलाइन्सचे विमान सोमवारी(१७ फेब्रुवारी ) लँडिंग करताना बर्फाळ जमिनीमुळे उलटले.विमानातील ७६ प्रवाशांपैकी १७ जण जखमी झाले असून सुदैवाने या घटनेत जीवीत हानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, डेल्टा एअरलाइन्सचे हे विमान अमेरिकेतील मिनेसोटा येथून टोरंटो विमानतळावर उतरणार होते. मात्र, विमान लँडिंग दरम्यान बर्फाळ जमिनीमुळे विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते उलटले.या विमानात ७६ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्ससह ८० प्रवासी होते. या अपघातात विमानातील ७६ प्रवाशांपैकी १७ जण जखमी झाले आहेत. ज्यात तीन गंभीर आहेत. गंभीर प्रवाशांमध्ये एक लहान मुलगा असून ६० वर्षीय एक पुरुष आणि ४० वर्षीय महिला आहे. किरकोळ दुखापत झालेल्या जखमींना रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरने परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पॅरामेडिक सर्व्हिसेसचे लॉरेन्स सँडन यांनी दिली.
या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.ज्यामध्ये लोक उलट्या विमानातून अडखळत बाहेर पडताना दिसत आहेत.यावेळी विमानतळावर बर्फवृष्टी होत असून जोरदार वारेही वाहत आहेत. क्रॅश लँडिंगनंतर विमानाला आग लागली. त्यावेळी विमानात अनेक प्रवासी होते. अग्निशमन दलाच्या अनेक पथकांनी तातडीने येऊन आग विझवली. त्यांनी काही मिनिटीतांच अपघातस्थळावरू प्रवाशांना बाहेर काढलं. हे विमान कसे उलटले हे अद्याप कळू शकलेले नाही. कॅनडाचे वाहतूक सुरक्षा मंडळ (TSB) या अपघाताची चौकशी करत आहे.दरम्यान, खराब हवामान, जोरदार वारे यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर विमानतळावरील कामकाज काही काळ थांबवण्यात आले होते. त्याचवेळी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता पुन्हा विमानसेवा सुरू झाली.