जळगाव – महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका, त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजे. सरकार येईल जाईल, पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सर्व राज्य सरकारे आणि राजकीय पक्षांना सांगतो, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करत आहे, असेही ते म्हणाले. जळगावातील ‘लखपती दीदी’ कार्यक्रमात बोलताना महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भाष्य केलं. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.
रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. वरपर्यंत मेसेज जाऊ द्या. हे पाप अक्षम्य आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका… त्यांचा हिशोब करा, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्या आहेत. आधी तक्रार येत होती, वेळेत एफआयआर होत नाही. सुनावणी होत नाही. खटला उशिरा सुरू होतो. निर्णय उशिरा येतो. या अडचणी भारतीय न्याय संहितेतून दूर केल्या आहेत. एक चॅप्टर महिला आणि बाल अत्याचाराचा आहे. पीडित महिलांना पोलीस ठाण्यात जायचं नसेल तर ई एफआयआर करू शकतात. ई एफआयआरमध्ये कोणी छेडछाड करणार नाही याचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे चौकशी चांगली होईल आणि दोषींवर शिक्षा करण्यास मदत होईल, असं मोदींनी सांगितले.
नव्या फौजदारी कायद्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाच्या नावाने मुलींची फसवणूक केली जायची. त्यावर शिक्षा होत नव्हती. आता यावर आम्ही कायदे केले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे. राज्याच्या सोबत आहे.अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची आहे, असं ते म्हणाले.
नेपाळमधील मृतांना वाहिली श्रद्धांजली
नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्या मृतांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, नेपाळ दुर्घटनेत आपण जळगावमधील अनेक सहकाऱ्यांना गमावले आहे. मी या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. ही दुर्घटना झाल्यावर भारत सरकारने नेपाळ सरकारशी संपर्क साधला. आपण राज्यमंत्री रक्षा खडसे यांना लगेच नेपाळला पाठवलं. जे लोक राहिले नाहीत, त्यांच्या पार्थिवांना आपण वायूसेनेच्या विमानाने आणलं. जे जखमी आहेत, त्यांच्यावर चांगले उपचार सुरू आहेत.