नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रोटोकॉल तोडून सोमवारी संध्याकाळी (१७ फेब्रुवारी) दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर स्वतः जाऊन कतारचे अमीर यांचे स्वागत केले. भारत आणि कतार यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी मोदींकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
कतारचे अमीर अल थानी हे २ दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार समंत केले जातील. परराष्ट्र खात्यानुसार, कतारचे अमीर यांचं मंगळवारी(१८ फेब्रुवारी )राष्ट्रपती भवन परिसरात औपचारिक स्वागत केले जाईल. त्यानंतर दिल्लीच्या हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदींसोबत त्यांची बैठक होईल. कतारचे अमीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या आमंत्रणावरून अमीर अल थानी दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आलेत. याआधी ते २०१५ साली दिल्ली दौऱ्यावर आले होते. भारत आणि कतार यांच्यात अलीकडच्या काळात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, औद्योगिक, संस्कृती यासह विविध क्षेत्रात मजबूत संबंध तयार झाले आहेत. यावेळीही कतारचे अमीर अल थानी यांच्या दौऱ्यावर महत्त्वाच्या करारावर शिक्कामोर्तब होऊ शकते.
३ जून १९८० साली कतारच्या दोहा इथं जन्मलेले तमीम बिन अल थानी यांचे वडील शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्यानंतर २५ जून २०१३ साली कतारचे अमीर बनले होते. ब्रिटनमध्ये शिक्षण पूर्ण करून तमीम बिन हमद यांनी कतार सैन्यात त्यांची सेवा दिली. ४४ वर्षीय तमीम ना केवळ कतारमधील सर्वात युवा श्रीमंत आहेत तर जगातील सर्वात युवा राष्ट्राध्यक्षांमध्येही त्यांचं नाव घेतले जाते. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी जगातील ९ वे सर्वात श्रीमंत शासक आहेत. त्यांची संपत्ती जवळपास ३३५ अब्ज डॉलर्स इतकी आहे