नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरू होऊन अवघा महिना पूर्ण झाला आहे. दरम्यान रविवारी (१४ जुलै) त्यांच्या एक्सवरील फॉलोअर्सच्या संख्येने १०० दशलक्ष (१०० मिलियन) संख्या पार झाली आहे. मागच्या तीन वर्षांत त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत जवळपास तीन कोटींनी वाढ झाल्याचे सांगितले जाते.
पंतप्रधान मोदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सर्वाधिक फॉलो केलेले जाणारे जागतिक नेते बनले आहेत. या लोकप्रियतेपुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सुद्धा मागे पडले आहेत. बायडन यांचे ३८.१ मिलियन, दुबईचे शासनकर्ते शेख मोहम्मद यांचे ११.२ मिलियन, पोप फ्रान्सिस यांचे १८.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.
देशांतर्गत नेत्यांमध्यही मोदी आघाडीवर – भारतात इतर भारतीय राजकारण्यांपेक्षा पंतप्रधान मोदींचे फॉलोअर्स जास्त आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे २६.४ मिलियन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २७.५ मिलियन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (१९.९ मिलियन), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (७.४ मिलियन), राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे २.९ मिलियन फॉलोअर्स आहेत.
आपले फॉलोअर्स वाढल्याची माहिती खुद्द पंतप्रधान मोदींनीच दिली. मोदी पोस्ट करत म्हणाले, एक्स वर शंभर मिलियन! या प्लॅटफॉर्मवर येऊन मी आनंदी आहे. तसेच फॉलोअर्सचे आभार मानले आहेत.