नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचे आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर याच्यावर पोलिस कारवाई करतीलच अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी नागपुरात दिली. नागपूर हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रशांत कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून परांगदा असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. प्रशांत कोरटकर दुबईला गेल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आणि गृह विभागावर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. यात संदर्भात खुद्द मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, यात असे आहे की, कोणतीही शहानिशा न करता बातम्या चालवल्या जात आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की, तो दुबईला जावो की, अजून कुठेही जावो. पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील असे त्यांनी स्पष्ट केले.