गँगटोक – पूर्व सिक्कीममध्ये आज, मंगळवारी सकाळी झालेल्या भूस्खलन एक वीज केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सातत्याने दरडी कोसळत आहेत. पूर्व सिक्कीममधील सिंगताम येथील दिपू दराजवळील बलुतार येथे भूस्खलनामुळे 510 मेगावॅट वीज केंद्राला लागून असलेली टेकडी धोक्यात आली होती. टेकडीचा मोठा भाग घसरला आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या तीस्ता स्टेज 5 धरणाचे पॉवर स्टेशन ढिगाऱ्याखाली गेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या भूस्खलनात मोठे दगड आणि मोडतोड पॉवरहाऊसच्या दिशेने वेगाने पडत असल्याचे दिसत आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, सतत भूस्खलन होत असल्याने वीज केंद्र काही दिवसांपूर्वी रिकामे करण्यात आले होते.
वीज केंद्राजवळ काम करणाऱ्या लोकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये खडकाचा एक भाग घसरत असून काही वेळाने त्याचा मोठा भाग वीज केंद्राच्यावर पडत असल्याचे दिसत आहे. त्यासोबतच सकाळी 7 वाजेच्या सुमारास झालेल्या भूस्खलनामुळे 17 ते 18 घरांचेही नुकसान झाले असून येथे वास्तव्यास असलेले कुटुंबिय सुरक्षिततेसाठी एनएचपीसी क्वार्टरमध्ये गेले होते. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये सिक्कीममध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस झाला होता. यामुळे लोनाक ग्लेशियल लेक ओव्हरफ्लो झाला. ढगफुटीमुळे सिक्कीमचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प, चुंगथांग येथील तीस्ता धरणाचा काही भाग वाहून गेला होता.