मुंबई – महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तणाव वाढला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी उपोषण स्थगित केले आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी भाजपाचा त्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव असल्याचा आरोप करत, मराठा समाजाला भाजपाच्या उमेदवारांना निवडणुकीत हरवण्याचे आवाहन केले. जरांगे पाटील यांच्या आरोपांनंतर, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. “तुम्हाला आमचे उमेदवार पाडायचे आहेत तर तुम्ही २८८ उमेदवार उभे करा. मग आम्ही पाहू तुम्ही कसे पाडता,” असा इशारा लाड यांनी दिला.
त्यांनी जरांगे पाटलांच्या भाषेवर आणि वर्तनावर कडवट टीका केली, “मनोज जरांगे पाटील खालच्या पातळीवर जाऊन प्रवीण दरेकरांवर टीका करत आहेत. उपोषणामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे का? ते सतत शिवराळ भाषेत टीका करतात.”लाड यांनी आरक्षणाच्या संघर्षाला समर्थन दिले पण जात, धर्म, आणि पंथाच्या मुद्द्यावर एकजुटीची गरज असल्याचेही सांगितले. “तुमचा विषय हा आरक्षणाचा आहे. आरक्षणाच्या तुमच्या संघर्षाला आमचा पाठिंबा आहे. पण प्रत्येकाचे रक्त लालच असते, त्याला धर्म, जात, पंथ नसतो. मराठा, शीख किंवा मुस्लीम असो,” असे लाड म्हणाले.
प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांना सांगितले की, “तुमच्या सत्य परिस्थितीवर आम्ही बोलायला लागलो तर कदाचित तुम्हाला तोंड लपवण्याची वेळ येईल.”मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आरोपांमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे. भाजपा आणि जरांगे पाटील यांच्यातील हा वाद आगामी निवडणुकांवर कसा परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.