मुंबई : शिवछत्रपतींच्या मराठी लेकरांनो, काय सांगतोय ते नीट ऐका असं म्हणत मराठी भाषेची थोरवी असलेला ‘बोल मराठी’ हा नवा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे यांनी हे गाणं गायलं असून, या गाण्याचं संगीत अभिजीत कवठाळकर यांनी दिलं आहे. बोल मराठी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती लंकेश म्युझिकने केली आहे. प्रवीण तरडे यांच्यासह मृण्मयी फाटक यांनीही गायन केलं आहे. हृषिकेश विदार यांनी गीतलेखन केलेल्या या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन राजेश कोलन यांचं आहे. योगेश कोळी यांचं छायांकन, अमोल निंबाळकर यांनी संकलन, सिद्धार्थ तातूसकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे.मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या अनुषंगाने मराठी भाषेची महती बोल मराठी या गाण्यात सांगण्यात आली आहे. अत्यंत सोपे शब्द, श्रवणीय संगीत असलेलं हे गाणं आहे. संगीतकार अभिजीत कवठाळकर यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, म्युझिक व्हिडिओचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर प्रवीण तरडे यांनी प्रथमच म्युझिक व्हिडिओचं गाणं गायलं आहे. युट्यूबवर लंकेश म्युझिक या चॅनेलवर हा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे.