मुंबई – उद्धव ठाकरे यांनी आज रंगशारदा येथील मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वक्तव्य केले. ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याचा भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलेली ही व्यक्तिगत धमकी आहे. परंतु भाजपा अशा धमक्यांना भीक घालत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडल्याचे उद्धव ठाकरेंच्या अशा बेताल वक्तव्यातून दिसून येते. उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय परंपरा, संस्कृती गुंडाळून ठेवलीय, असे जोरदार प्रत्युत्तर दरेकर यांनी दिले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या संस्कृतीला, राजकीय परंपरेला अशोभानीय अशा प्रकारचे उद्धव ठाकरेंचे वक्तव्य आहे. मराठवाड्यात २० हजार कोटीची गुंतवणूक आणली गेली त्याचे प्रसारमाध्यमांत कौतुक होईल म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरेंनी हे जाणीवपूर्वक विधान केले आहे. महाराष्ट्रात सगळ्याच अपप्रवृत्ती उराशी बाळगणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस कर्दनकाळ वाटतात. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस आहेत हे सिद्ध होते. उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय परंपरा, संस्कृती गुंडाळून ठेवलीय. नाक्यावर जसे व्यक्तिशः भांडण होते अशा प्रकारचे पोरकट वक्तव्य उद्धव ठाकरेंचे आहे, अशी टिकाही दरेकरांनी केली.
दरेकर पुढे म्हणाले की, नडलो तर नडलो परंतु स्वतः इतका बेकार पडलो त्याची त्यांना काहीच कल्पना नाही. उद्धव ठाकरेंचे पूर्वी १६ खासदार होते. आता ८ खासदार निवडून आलेत. एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट ५० टक्के आहे. शिंदेंना ठाकरेंपेक्षा मोठे यश मिळाले. ठाकरे मिळालेल्या अपयशातही यश समजत आहेत हे त्यांचे कर्तृत्व. मोदी या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तरी तुम्हाला यश मिळाल्याची दवंडी पिटताय यापेक्षा तुमचे राजकीय ज्ञान किती आहे ते दिसून येते. नडानडीची कितीही भाषा करा फडणवीस त्यांच्या कामातून लोकांना जिंकताहेत आणि तुम्ही नाक्यावरची भाषा अशीच करत रहा. हिंदुत्ववादी जनता विधानसभेला उद्धव ठाकरेंचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असेही दरेकरांनी म्हटले.
तसेच उद्धव ठाकरे स्वतः गुर्मीत बोलताहेत आणि दुसऱ्याची गुर्मी काढताहेत. मुस्लिम मतं, इतर काही मतं यातून उद्धव ठाकरेंना अनपेक्षित अशा प्रकारच्या काही जागा मिळाल्या आहेत त्यातून त्यांना अहंकार आणि गर्व झालाय. गर्वाचे घर नेहमी खाली होते. विधानसभेला मोदींची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काफी आहेत, तुम्हाला पुरून उरतील, असेही दरेकरांनी ठाकरेंना सुनावले.
दरेकर पुढे म्हणाले, ज्यांचे आयुष्यच टेंडरबाजीमध्ये गेले, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून टेंडर हे आपले उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. मुख्यमंत्री म्हणून कामं करत असताना कोविडच्या टेंडरमध्येही घोटाळा केलात. प्रेताच्या बॉडीबॅगेत, कोविड सेंटरमध्ये घोटाळा केलात. तुम्हाला टेंडरचा अभ्यास नीट आहे. त्यामुळे धारावीच्या टेंडरचा सखोल अभ्यास केला असाल परंतु अभ्यास झाल्यानंतर त्यांच्याकडे अदानी पोचले नसतील किंवा पोचले असतील तर पुरेसे समाधान झाले नसेल त्यासाठी हा अट्टाहास उद्धव ठाकरेंचा असल्याचे दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, फळ येणाऱ्या झाडावरच लोकं दगड मारत असतात. वांझोट्या झाडावर कुणी दगडं मारत नसते. आता जे वांझोटे असतील त्यांच्यावर ना कुणी दगडं मारत ना टीका करत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. कामाचा आवाका त्यांचा प्रचंड आहे. महाराष्ट्राचे सर्वेसर्वा त्रिकालाबाधित आम्ही नेते आहोत असे ज्यांना वाटत होते. त्यांना जागेवर बसविण्याचे कामं फडणवीसांनी केले. महाराष्ट्रात जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना त्यांच्या जागा दाखवत सर्वसामान्यांसाठी कामं केले. म्हणून फडणवीसांच्या बाजूने लोकप्रियता आहे आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीसांचा मत्सर म्हणून संपविण्याची भाषा विरोधक करताहेत. परंतु जेवढे फडणवीसांवर बोलाल, दगडी माराल तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या मागे प्रचंड पाठबळ उभे करेल हे येणारा काळ दाखवून देईल.
ठाकरे केवळ तोंडाच्या वाफा घालवू शकतात
उद्धव ठाकरेंनी हात उखडून फेकून देऊ असे वक्तव्य केलेय. परंतु त्यांनी कुणाचा हात उखडून फेकून दिल्याचे मला माहित नाही. उलट आमच्यासारखे शिवसैनिक होते जे बाळासाहेबांच्या आदेशावरून संघर्ष, लफडी करत होते. उद्धव ठाकरे फक्त तोंडाची वाफ दवडताहेत त्यांनी कुणाला कधी छोटा खडाही मारलेला नाही. केवळ तोंडाच्या वाफा उद्धव ठाकरे घालवू शकतात आणि तेच ते करताहेत, असा टोलाही दरेकरांनी लगावला.