नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका संदेशामध्ये राष्ट्रपती म्हणाल्या, “आपल्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व देशवासीयांना मन:पूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा देते. बाबासाहेबांनी आपल्या प्रेरणादायी जीवनात अत्यंत कठीण परिस्थितीतही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि त्यांच्या असामान्य कार्यामुळे संपूर्ण जगात मान्यता प्राप्त केली.
असामान्य बुद्धिमत्ता आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले बाबासाहेब हे एक अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि थोर समाजसुधारक होते. समानतेच्या समाजव्यवस्थेचे ते कट्टर समर्थक होते. त्यांनी महिला आणि वंचित वर्गांच्या आर्थिक आणि सामाजिक अधिकारांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तन आणि दुर्बल घटकांच्या सबलीकरणाचे महत्त्वाचे साधन मानले. विविध क्षेत्रांतील त्यांचे योगदान भावी पिढ्यांना राष्ट्रनिर्मितीसाठी निष्ठेने कार्य करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील. या प्रसंगी, आपण सर्वांनी डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि आदर्श आपल्या जीवनात अंगिकारण्याचा आणि सामाजिक ऐक्य व समतेचा आत्मा साकारणारे राष्ट्र घडविण्याचा संकल्प करूया.”