मुंबई – नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारून बनावट नोटा छापणा-या एका ३६ वर्षीय तरुणाला अटक केली. प्रफुल्ल गोविंद पाटील असे या आरोपीचे नाव असून त्याने यु-ट्यूबवर पाहून आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून २ लाख ३ हजार रुपये किमंतीच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. आरोपीच्या घरात २ लाख ३ हजार २०० रुपयांच्या ५०, १०० आणि २०० रुपयांच्या छापिल बनावट नोटा जप्त केल्या.
नवी मुंबईतील प्रफुल्ल हा नववी शिकलेला असून घरच्यांपासून एकटाच वेगळा राहतो. आर्थिक चणचण भागवण्यासाठी त्याने बनावट नोटा कशा तयार करायच्या, याची माहिती यू-ट्यूबवर मिळवली होती. याद्वारे त्याने १०, २०, ५०, १०० व २०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती. मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्याची प्राथमिक माहिती आहे. मागील तीन-चार महिन्यापासून प्रफुल्ल पाटील याने अशा पद्धतीने बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे त्याने आतापर्यंत किती बनावट नोटा बाजारात आणल्या, तसेच या नोटा बाजारात कुठे-कुठे वापरल्या, याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येत आहे.