पंढरपुरात आदिवासी महादेव कोळी जमातीचे नेते गणेश अंकुशराव आक्रमक
पंढरपूर – आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतानाच पंढरीतील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात आदिवासी महादेव कोळी जमातीच्या बांधवांकडून फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. आदिवासी कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या समाजाचे नेते गणेश अंकुशराव यांनी मोठा लढा उभारलाय, आदिवासी कोळी जमातीला जातीचे दाखले सुलभरित्या मिळावे, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागेच्या पात्रात स्मारक उभारावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी गणेश अंकुशराव यांनी आपल्या समाजातील कार्यकर्त्यांसह अनेक आंदोलने केली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अनेकदा निवेदने दिली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन दहा वर्षे झाली, परंतु एकही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आता आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांमधुन संतापाचा उद्रेक होत आहे.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ दौऱ्यादरम्यान पंढरीतील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात काळ्या फिती लावून केलेल्या निषेध आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करताना परत जा परत जा, देवेंद्र फडणवीस परत जा अशा जोरदार घोषणा करत गणेश अंकुशराव व समाजातील कार्यकर्त्यांनी यांनी अखेरचा इशारा दिला आहे. तातडीने आमचे प्रश्न सोडवा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात मोठे जनआंदोलन उभे करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे