पुणे – गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध विमान कंपन्यांना त्यांची विमाने उडवून देण्याच्या धमक्या येत आहेत. अशात आता पुणे विमानतळावरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्याहून वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या 11 विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. एक्सवरून एका नामांकित एअर कंपनीच्या मॅनेजरला ट्विट करत उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.
विमान क्षेत्रात नामांकित असलेल्या या कंपनीच्या मॅनेजरला एक मेल आणि एक्स पोस्ट आली असून, यामध्ये या आरोपीने पुण्याहून परदेशासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या विमानात बॉम्ब असून बॉम्ब थोड्याच वेळात ब्लास्ट होणार आहेत अशी धमकी दिली. या धमकीमुळे विमानतळासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही विमाने दिल्ली ते पुणे आणि पुणे ते कलकत्ता यासह वेगवेगळ्या शहरात निघाली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.