निफाड- उन्हाळा संपला तरी तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरातील बाजारपेठेत लांबट आणि गोल जांभळे दाखल होताना दिसत आहेत.यंदा उत्पादन घटल्याने आवक कमी झाली आहे.त्यामुळे ही जांभळे सफरचंदापेक्षा महाग झाली आहेत.एक किलो जांभूळ २०० रुपये किलोने, तर सफरचंद १८० रुपये किलो दराने विकली जात आहेत.
शहरातील निफाड नाका,बसस्थानक आणि चिंचखेड चौफुली आदी भागात रस्त्याच्या कडेला जांभळाची विक्री केली जात आहे.यंदा प्रखर उन्हाळ्यात जांभळाचा फुलोरा जळून गेल्याने जांभळाची आवक घटली आहे.त्यामुळे जांभळाचे भाव दुपटीने वाढले आहेत.बाजारात रानमेवा म्हणून जांभळाची ओळख आहे.हा रानमेवा वनौषधी म्हणुनही उपयोगात आणला जातो.