ज्‍येष्‍ठांच्‍या आयुष्‍यात आनंद फुलविण्‍याचा उद्देश: नितीन गडकरी

0

खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचा थाटात शुभारंभ

नागपूर : ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्‍य अधिकाधिक आनंदी करण्‍याचा, त्‍यांच्‍या आयुष्‍यात सकारात्‍मकता यावी, त्‍यांचे आयुष्‍य सुखकर व्‍हावे, प्रसन्‍न मनाने त्‍यांना सामाजिक कार्यात योगदान देता यावे, या उद्देशाने दरवर्षी विविध शिबिरांसह खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे आयोजन केले जाते. त्‍याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून महोत्‍सवामागचा उद्देश सफल होत असल्‍याचे दिसते आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त्‍ केले. नितीन गडकरी यांची संकल्पना असलेल्या खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सुरेश भट सभागृहात झाले. त्‍यावेळी ते बोलत होते.

प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते या सोहळ्याचे थाटात उद्घाटन झाले. मंचावर ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ता मेघे, पद्मश्री डॉ. विलास डांगरे, डॉ. संजय उगेमुगे, अशोक मानकर, हाजी शकील सैफी, प्रतापसिंग चव्हाण यांची उपस्थिती होती. ज्येष्ठ नागरिकांना सहलीचा आनंद घेता यावा यासाठी आणखी ४ इलेक्ट्रिक बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्‍याचे सांगत नितीन गडकरी यांनी कमाल चौकात अल्पदरात सर्व वैद्यकीय चाचण्या व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्‍याची माहिती दिली. वर्धा रोडवर सात मजली इमारत आकाराला येत असून, त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी निःशुल्क सभागृह व ऑरगॅनिक फ्रुट बाजार राहील, असे ते म्‍हणाले.

ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिष्‍ठानतर्फे राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध शिबिरांसह, पुर्णब्रम्‍ह अन्‍नदान योजना आदींची माहिती त्‍यांनी दिली. नितीनजींसारख्या अभ्यासू, काळजीवाहू नेत्यामागे खंबीरपणे उभे राहून, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानला सहकार्य करावे, असे आवाहन दत्ता मेघे यांनी यावेळी केले. प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर डॉ. विलास डांगरे यांच्‍यासह इतर मान्यवरांचा सत्कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.

पुरस्काराचे खरे वाटेकरी जनताजनार्दन ! : डॉ. विलास डांगरे लक्षावधी रुग्णांना जीवनदान देणारे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नितीन गडकरी यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना डॉ. डांगरे म्हणाले, या पुरस्काराचे खरे वाटेकरी जनता जनार्दन आहे. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने समाजाची सेवा करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र निवडले व त्यातच जीवनाची सार्थकता गवसली. हा पुरस्कार मी जनमानसाला समर्पित करतो, असे भावोद्गार डॉ. डांगरे यांनी काढले.

मराठीमुळे सिनेजगतात संधी : जितेंद्र अतिशय सज्जन, कामाचा मोठा आवाका असणाऱ्या नितीन गडकरी यांनी या महोत्सवाचे आमंत्रण दिल्याचा विशेष आनंद आहे. नागपूरवासियांना भेटून ‘बिछडा यार’ मिळाल्याची अनुभूती आली, असे उद्गार जितेंद्र यांनी काढले. रसिकांनी मराठीतून बोलण्‍याचा आग्रह धरल्‍यानंतर जितेंद्र यांनी गिरगावातील जीवनाचा सुखद काळ मराठीमध्‍ये रसिकांसमोर उभा केला. ते म्हणाले, त्या जुन्या दिवसात आनंद, शांतता होती. त्या अप्रूप क्षणांना मी खूप मिस करतो. मी ज्युनियर आर्टिस्ट असताना, माझ्या मराठी ज्ञानाचे कौतुक वाटून शांतारामबापू यांनी मला ब्रेक दिला. त्यांच्या अस्खलिखीत मराठीने श्रोत्यांचे मन जिंकले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech