शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही पंढरीत?

0

मुंबई – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. येत्या १७ जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या या पंढरपूरला जात असतात. पंढरीला जाणारी आषाढी वारी ही महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून चालत आलेली महत्त्वाची परंपरा राहिली आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. या वारीत आता राहुल गांधीही सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काँग्रेस पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी हे पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी होण्याविषयी विचार करत आहेत. राज्यात येत्या तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास काँग्रेस पक्षासाठी ते फायदेशीर ठरू शकते. राहुल गांधी यांनी यापूर्वी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हजारो किलोमीटरची पायपीट केली आहे. त्यामुळे पंढरीच्या वारीत चालणे त्यांच्यासाठी सहजसोपी गोष्ट ठरू शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक १३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य संचारले आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येईल. तसेच यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील कैकपटीने वाढू शकतो.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने काँग्रेसच्या झोळीत भरभरून १३ जागांचे दान दिल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वांत मोठा उत्सव असणा-या आषाढी सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १३ किंवा १४ जुलै रोजी पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. याबाबत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने यास दुजोरा दिला असून १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा असल्याने त्यापूर्वी १३ किंवा १४ जुलै रोजी राहुल गांधी विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत. त्यापूर्वी पालखी सोहळ्यासोबत चालण्याचा आनंदही त्यांना घ्यायचा असून याबाबत देखील प्रयत्न करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी पालखी सोहळे हे माळशिरस तालुक्यात असणार असून यावेळी माळशिरस ते वेळापूर या मार्गावर राहुल गांधी वारक-यांसोबत वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech