नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नगापुरातील जगप्रसिद्ध दीक्षाभूमीला भेट दिली. तसेच तथाकत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. राहुल गांधी यांचे बुधवारी दुपारी विशेष विमानाने नागपुरात आगमन झाल्यानंतर त्यांचे उत्साहात स्वागत झाले. नागपूर विमानतळावर व रस्त्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या स्वागताचा स्वीकार करून ते थेट पवित्र दीक्षाभूमीवर पोहोचले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई, सचिव विलास गजघाटे यांच्याकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दीक्षाभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले. यावेळी राज्याचे प्रभारी रमेश चेंनिथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार श्याम बर्वे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडघे, बंटी शेळके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यानंतर दक्षिण पश्चिम, पश्चिम व दक्षिण मतदार संघातील काही भागातून रस्त्याने जात ते दुतर्फा उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांचे, नागपूरकरांचे स्वागत स्वाकारले. यानंतर रेशीमबाग परिसरातील सुरेश भट सभागृहात ओबीसी युवा मंच व विविध संघटना तर्फे आयोजित संविधान सन्मान संमेलनाला ते सहभागी झाले.