अमरावती – महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा ऐतिहासीक अशा अमरावती अंबानगरीत 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता स्थानिक सायन्सस्कोर मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. अमरावती विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार पप्पू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेमध्ये राज ठाकरे हे राज गर्जना करणार असल्याची माहिती पप्पू उर्फ मंगेश पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज ठाकरे यांच्या राजगर्जनेमुळे अमरावती विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण चित्र पालटून जाईल आणि एक वेगळी राजकीय परिस्थिती दिसेल असा दावा देखील पप्पू पाटील यांनी याप्रसंगी केला.
राज ठाकरे हे विदर्भातून आपल्या प्रचार दौर्याचा प्रारंभ ऐतिहासीक अशा अंबानगरी अमरावती मधून करणार असून 6 नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांचे अमरावतीत आगमन होईल. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील प्रमुख मनसे कार्यकर्ते व पदाधिकार्यांसोबत चर्चा करून मग ते सभास्थळी रवाना होतील. सायंकाळी 6 वाजता स्थानिक सायन्सस्कोर मैदान येथे आयोजित जाहीर सभेला ते मार्गदर्शन करणार असून या सभे नंतर ते रवाना होतील, अशी माहिती पप्पू पाटील यांनी दिली. राज ठाकरे यांच्या सभेला समस्त अमरावतीकरांनी तसेच मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे उमेदवार पप्प्ाू पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. सभा ऐतिहासीक होणार मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अमरावतीत होणारी सभा ऐतिहासीक होईल व सर्व रेकॉर्ड मोडीत काढेल, असा दावा पप्पू पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. या सभेला लाखो नागरिक उपस्थित राहणार असून सभेच्या नियोजनासाठी व यशस्वीतेसाठी मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी कामाला लागल्याचे त्यांनी सांगितले.