अमरावती – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना धक्का बसला होता. त्यांच्या पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. ते अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशावरून आता बच्चू कडूंचे कट्टर विरोधक रवी राणा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पटेल यांना शिंदेंच्या शिवसेनेत बच्चू कडू यांनीच पाठवले आहे. त्या मागे मोठे आर्थिक गणित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना पुन्हा एकदा लक्ष केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची साठगाठ आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांना शिंदेंकडे पाठवणे हे बच्चू कडू यांचीच ही खेळी आहे, असा गौप्यस्फोट राणा यांनी केला आहे. शिवसेनेने मेळघाटमध्ये राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्या विरोधात काम करू असा इशाराही राणा यांनी यावेळी दिला आहे.
आमदार बच्चू कडू हे सोयीनुसार राजकारण करत असता. त्यामुळे येणाऱ्या काळात बच्चू कडू यांचा हिशोब ठेवू असा इशाराही रवी राणा यांनी दिला. “बाप बडा ना भय्या, सबसे बडा रुपया” अश्या प्रकारे बच्चू कडू यांच राजकारण आहे असे सांगत या मागे मोठी आर्थिक गणितं असल्याचे संकेतही रवी राणा यांनी दिले आहेत. काही दिवसां पूर्वीच राजकुमार पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला होता. तुम्ही आम्हाला एक धक्का दिला पण आम्ही पुढे तुम्हाला अनेक धक्के देऊ असे बोलले होते.
अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात बच्चू कडू विरूद्ध रवी राणा हा संघर्ष नेहमीच पाहायला मिळत आहे. दोघे ही एकमेकावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीत असूनही बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवला होता. या निवडणुकीत राणा यांचा पराभव झाला. त्याचा राग रवी राणा यांच्या मनात अजूनही आहे. त्यातूनच दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत.