मुंबई – अनंत नलावडे
राज्यसभा पोटनिवडणुकी साठी दोन अपक्षांनी भरलेले तीनही उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने अखेर दोन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ ओगॅस्ट असल्याने तूर्त याची अधिकृत घोषणा त्याच दिवशी केली जाईल. राज्यसभा पोटनिवडणुकीच्या दोन जागांसाठी दाखल झालेल्या चार उमेदवारांच्या पाच अर्जापैकी भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन जाधव -पाटील यांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर अर्जावर सूचक आणि अनुमोदक यांच्या सह्या नसल्याने दोन अपक्ष उमेदवारांचे तीन अर्ज बाद ठरले.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे जुलै २०२२ मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत जुलै २०२८ पर्यंत होती.परंतु,भाजपने त्यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यात पियूष गोयल मोठया मताधिक्याने निवडूनही आले. त्यामुळे त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणाऱ्या नितीन पाटील यांना राज्यसभा सदस्य म्हणून काम करण्यास चार वर्षाचा कालावधी मिळणार आहे. तर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून जाण्यापूर्वी छत्रपती उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे सदस्य होते. ते एप्रिल २०२० मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपणार होती. त्यामुळे भोसले यांच्या जागेवर राज्यसभेवर जाणाऱ्या भाजपच्या धैर्यशील पाटील यांना खासदार म्हणून काम करण्यास दोन वर्षापेक्षा कमी अवधी मिळेल.