मुंबई – राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यसभा खासदार छत्रपती उदययनराजे भोसले यांचा कार्यकाळ दिनांक 5 एप्रिल 2026 आणि राज्यसभा खासदार पियूष वेदप्रकाश गोयल यांचा कार्यकाल 4 जुलै 2028 असा आहे. तथापि, 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत श्री.भोसले आणि श्री.गोयल विजयी झाल्याने राज्यसभेचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
या पोटनिवडणुकीची अधिसूचना बुधवार, 14 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बुधवार, 21 ऑगस्ट 2024 तर गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 ला अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, 26 ऑगस्ट 2024 अशी असून मंगळवार 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. या पोटनिवडणुकीची मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे 3 सप्टेंबर 2024 ला सायंकाळी 5 वाजेपासून सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया शुक्रवार 6 सप्टेंबर 2024 रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.