भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचा टोला
मुंबई – रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते असून त्यांनी प्रसार माध्यमांशी किंवा जाहीर मेळाव्यात वितुष्ट निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही.उणीधुणी काढायचीच झाली तर प्रत्येक पक्ष एकमेकांविषयीची उणीधुणी काढतील. परंतु त्यातून महायुतीत विसंवाद होऊ शकतो.अशा गोष्टी चार भिंतीत तीनही पक्षाच्या समन्वय बैठकांत चर्चा व्हायला हवी,असा सबुरीचा सल्ला भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी कदम यांना गुरूवारी प्रदेश भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, उध्दव ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे वकील आहेत. निवडणुकीबाबत माहिती असणारा आमदार,कार्यकर्ते आहेत. मात्र पदवीधर मतदारांच्या नोंदीच्या बाबतीत काही आक्षेप होते, तरं आक्षेप घ्यायला वेळ असतो त्यावेळीच का नाही आक्षेप घेतला.त्यामुळे रडीचा डाव अनिल परब यांनी आता खेळू नये.कदाचित असलेल्या मतदार यादीतून त्यांना स्वतःचा पराभव दिसत असेल.त्यामुळे पराभव झाल्यानंतर त्याची कारणे ते आताच शोधून ठेवत असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की,उद्धव ठाकरेंना टोमणे मारणे,दुसऱ्याचा मत्सर करणे, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना टोमण्याच्या पद्धतीत बोलणे हा त्यांचा स्थायीभाव झालाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेला समोर बसलेल्या पाचशे-हजार लोकांना बरे वाटत असेल.परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारची टोमणेबाजी आवडत नाही,याची जाणीव त्यांना होत नसावी.
ते पुढे म्हणाले की,रामदास कदम यांच्यावर कुणी आरोप केला की, दापोलीला झालेले मतदान काय दाखवून देते? त्याचे उत्तर रामदास कदम यांच्याकडे आहे का.किती मतांचा लीड मिळाला? हे रामदास कदमांनी सांगावे.उगाच महायुतीत राहून युतीतील पक्षाच्या नेत्याविषयी असे बोलणे पूर्णपणे चुकीचे आहे.उलटपक्षी रविंद्र चव्हाण यांच्यामुळे कोकणात चांगले यश मिळालेय.नारायण राणे,नरेश म्हस्के,श्रीकांत शिंदे, हेमंत सवरा यांची जागा निवडून आली तेथे चव्हाण यांनी जीवाची बाजी लावून जागा निवडून आणली.जर एखादा नेता,आमदार महायुतीसाठी जीव ओतून काम करत असेल आणि त्यांच्याच विषयी अशा प्रकारचे वक्तव्य असेल यापेक्षा दुर्दैव काय? असा प्रश्नही त्यांनी कदम यांना विचारला.