मुंबई – “महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांत भाजपचा पुरता निकाल जनतेने लावला आहे. ‘अब की बार चार सौ पार’वाल्यांचे नाक महाराष्ट्राने कापले, तर त्यांचे दोन्ही कान उत्तर प्रदेशने व ‘मुंडण’ कार्यक्रम राहुल गांधी यांनी केला. तरीही हे लोक विजयाच्या पिपाण्या वाजवत फिरतात हा विनोद आहे,” असा खोचक टोला उद्धव ठाकरे गटाने लगावला आहे. “भाजपचा आकडा महाराष्ट्रात नऊवर आला. या नऊमधले काही जण तर घातपाताने किंवा अपघाताने जिंकले. त्यातील एक महामानव म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे हे आहेत. राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
“आता श्रीमान राणे यांनी दावा केला आहे की, ‘‘लोकसभा निवडणुकीत कोकणातील शिवसेना आपण संपवली. यापुढे कोकणात कुणाला थारा देणार नाही. आमच्या आडवे कोण आले तर त्यांची जागा दाखवून देऊ.’’ नारोबांचे हे फूत्कार भाजपच्या अहंकारी वृत्तीस साजेसे आहेत. काही लोकांना ‘जय’ विनम्रपणे स्वीकारता येत नाही. त्यातले हे महाशय आहेत,” अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. “राणे हे आधीच्या मोदी सरकारात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग खात्याचे मंत्री होते. नव्या रालोआ मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या अतिसूक्ष्म अकलेस झिणझिण्या आल्या व त्यातूनच ‘शिवसेना संपली, संपवली’ अशी भाषा बोलू लागले,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.