मुंबई- जागतिक पर्यटन स्थळ असलेली माथेरानची राणी पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या मिनी ट्रेनला मध्य रेल्वेकडून लवकर आकर्षक असे कोळशाच्या इंजिनचा लूक असलेले डिझेलवर चालणारे नवीन इंजिन मिळणार आहे. नवा लूक असलेल्या या इंजिनच्या गाडीतून प्रवास करणे म्हणजे पर्यटकांना आता एक पर्वणीच ठरणार आहे.
या इंजिनाची रचना वाफेच्या इंजिनसारखी असून यातून शिट्टीदेखील वाफेवर वाजणारी फुसफुसणारी असेल. या इंजिनाला हेरिटेज लुक देण्यात आला असून यापासून पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही. हे इंजिन परळ लोकेशेडमध्ये असून ते लवकरच रस्तामार्गे नेरळ येथे आणून त्याची जोडणी केली जाणार आहे. हे इंजिन पूर्णपणे सुरक्षित आहे तर माथेरानचर घाट पूर्ण क्षमतेने चढेल. साधारण जून महिन्यात हे इंजिन माथेरान रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान,सुमारे सत्तर वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने माथेरानच्या गाडीच्या ताफ्यात नवीन कोळशावर चालणारी स्टीम इंजिन बनवली. माथेरानचे आकर्षण असणारी ही कोळशावर चालणारी स्टीम इंजिन घाटातून जाताना अनेक ठिकाणी कोळशाच्या ठिणग्या उडून आजूबाजूचे गवत जळत असे, तर १९७७ आसपास या इंजिनातून निघालेल्या कोळशाच्या ठिणग्यांमुळे जुम्मापट्टीजवळ काही घरांना आग लागली होती. त्यानंतर हे इंजिन चालण्यावर आक्षेप घेण्यात आला. तर, इंजिनासाठी कोळसादेखील मिळेनासा झाला. मध्य रेल्वेकडून २० सप्टेंबर १९८२ साली माथेरानसह महाराष्ट्रातील वाफेवर चालणारी इंजिन्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.