गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घेऊन रश्मी शुक्ला यांनाही निलंबित करा

0

नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – अनंत नलावडे

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत. तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.तरं पुण्यातही एका माजी नगरसेवकाची गोळ्या घालून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.हे सर्व लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्याचा राजीनामा घेऊन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनाही निलंबित करावे,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.

पटोले यांनी यावेळी भाजपा युती सरकारवर जोरदार तोफ डागताना म्हणाले की,बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर १५ दिवस अत्याचार सुरु होते हे उघड झाले असताना शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजही गायब आहे. बदलापूर पोलीस स्टेशनमधील महिला अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची मुंबईत बदली करुन एकप्रकारे बक्षिसच दिले असून ही शाळा भाजपा आरएसएसशी संबंधित असल्याने शाळा संचालक आपटेला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे त्यात योगदान दिसत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडलेला असताना भाजपा युती सरकार मात्र जनतेच्या पैशावर इव्हेंटबाजी करून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहेत.सणासुदीच्या दिवसात शेतकरी व जनतेला वाऱ्यावर सोडून सरकारी तिजोरी लुटली जात आहे.शेतकरी संकटात असताना केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

पोस्टरला काय जोडे मारता हिम्मत असेल तर समोर या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर पटोले म्हणाले की,अजित पवारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी निवडणूक लावावी म्हणजे जनता समोर येऊन काय करेल ते त्यांना दिसेल.

भाजपा आमदार नितेश राणेंवर बद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पटोले म्हणाले,नितेश राणे पोलिसांनाच शिव्या देतो,धमक्या देतो पण त्याच्यावर कारवाई केली जात नाही.कोणाच्याही धर्माला शिव्या देण्याचा अधिकार कोणालाच नाही.पण निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात असला तरी राज्यातले सामाजिक वातावरण बिघडण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही,असा इशाराही पटोले यांनी दिला.

जातनिहाय जनगणनेचे राजकारण करु नये या आरएसएसच्या मोहन भागवत यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता, यात राजकारण नाही.मात्र शोषित, वंचित,पीडित समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक फायदा मिळावा व समाजाच्या मुख्य प्रवाहात या घटकांना आणण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे असून या समाज घटकांचेही भले व्हावे हीच त्यामागची भूमिका आहे.एकतर भाजपा सरकार मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत नाही,उच्च शिक्षणाचे दरवाजे बंद करत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेकदा आरक्षण संपवले पाहिजे अशी जाहीर भूमिका मांडलेली आहे,असा मार्मिक टोलाही पटोले यांनी लगावला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech