सातारा सारख्या शहरातून येऊन जेंव्हा एअर इंडिया मध्ये नोकरी मिळाली तेंव्हाच भरभरून काही मिळाल्याचा आनंद झाला. पण एवढं मिळेल याची कल्पनाही सुरुवातीला नव्हती. मी एअर इंडिया बिल्डिंग, नरिमन पॉईंट येथे काही वर्ष काम केले. नंतर माझी ट्रान्सफर इंटरनॅशनल एअरपोर्टला झाली वेगवेगळे विभाग आहेत तसेच एक स्पेशल हँडलिंग म्हणजेच व्हीआयपी सीआयपी सेलिब्रिटीज यांच्यासाठी. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एक वेगळा विभाग आहे. त्यात माझी नियुक्ती झाली आणि विचार करू शकत नाही एवढ्या मोठ्या लोकांना भेटण्याचा योग आला. माझे एकच ध्येय होतं की जे काम करायचं ते अगदी मनापासून करायचं, त्यात कुठलाही स्वार्थ नसायचा. त्यामुळे खूप व्हीआयपींना भेटले, पण कुठल्या आशेने त्यांच्याकडे मी कधीच पाहिलं नाही आणि एक दिवस पद्मविभूषण रतन टाटांना भेटण्याचा योग आला.
योग आला म्हणजे माझी ड्युटी होती त्यांना सुविधा उपलब्ध करून देरण्याची. थोडी घाबरले होते पण म्हटलं की नाही आपण आपलं काम चोख करायचं. त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक व्हीआयपींना गेट पासून रिसिव्ह करतो त्याप्रमाणे एक लोडर घेऊन मी गेटवर उभी राहिले. आम्ही व्हीआयपीचे पासपोर्ट आमच्या हातात घ्यायचो आणि त्यांना एक वेटिंग रूम मध्ये बसवून त्यांचा बोर्डिंग कार्ड त्यांचे इमिग्रेशन फॉर्म भरून त्यांच्या हातात द्यायचं. परंतु रतन टाटा साहेबांच्या बाबतीत हे असं कधीच घडायचं नाही. त्यांनी कधी त्यांचा पासपोर्ट आमच्याकडे दिला नाही किंवा कधी आम्हाला त्यांचा इमिग्रेशन फॉर्म भरून बोर्डिंग कार्ड काढून आणायला सांगितलं नाही. ते स्वतः काउंटरला उभे राहत असत.
काउंटर वरच्या स्टाफला भयंकर दडपण यायचं कारण स्वतः टाटा साहेब समोर उभे आहेत हे बघून ते घाबरून गेलेले असायचे आणि त्यातच ते बोर्डिंग कार्ड लवकर निघायचं नाही परंतु रतन टाटा त्या स्टाफला खूप धीर देत म्हणायचे “डोन्ट वरी, टेक युअर टाईम” आणि ते थांबून स्वतःच बोर्डिंग कार्ड स्वतःच्या हातात घेत असत. इमिग्रेशन ऑफिसरला मी पळत पळत जाऊन सांगायचे की टाटा साहेब येत आहेत. पण टाटा साहेब नेहमीसारखे इमिग्रेशनच्या लाईन मध्ये उभे राहत. सीन असा होता. इमिग्रेशन ऑफिसर उभे राहून त्यांना पुढे बोलवत होते परंतु टाटा साहेब पुढे यायला तयार नव्हते आणि पॅसेंजरने मागे वळून पाहिले तेंव्हा त्यांना दिसले टाटा साहेब लाईन मध्ये उभे आहेत. पण लोकांचा रिस्पेक्ट बघा किती की कोणीही पुढे जायला तयार नव्हतं ते सगळे टाटा साहेबांना पुढे जायला विनंती करीत होते. नाइलाजाने टाटा साहेबांना पुढे जाऊन आपले इमिग्रेशन क्लिअर करावे लागत असे. असं नेहमीच घडत असे. असंच एक दिवशी माझी नाईट ड्युटी होती आणि रतन टाटा साहेब ट्रॅव्हल करत होते.
नेहमीसारख्या सगळ्या फॉर्मालिटीज पूर्ण झाल्यानंतर मी त्यांना बोर्डिंग साठी घेऊन जात होते. चालता चालता ते म्हणाले,” यु आर सो एनर्जेटिक, आय वॉन्ट टू गिव्ह यु वन नोट”. मी त्यांना बोर्ड केलं आणि विचार करत राहिले की मला ते ऍप्रिसिएशन लेटर देणार आहेत वाटतं. नाईट करून दोन दिवसाचा ऑफ होता म्हणून मी सातारला गेले परंतु नेमकं दोन दिवसांनी ते येणार होते. त्यावेळी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणी सीनियर स्टाफ नव्हता. मला वरिष्ठ अधिकारी यांचा फोन आला की टाटा साहेब या या फ्लाईटने येत आहेत आणि तुम्ही त्यांना हँडल करायचे आहे. तेंव्हा मी नेमकी सातारला होते आणि मला पुन्हा मुंबईला यावं लागलं आणि मी जेंव्हा परत आले तेंव्हा त्यांना हँडल केलं, अरायव्हल हॉल मध्ये आम्ही आलो आणि बॅग येई पर्यंत आम्ही बोलत उभे असताना त्यांना आठवलं आणि ते म्हणाले,” येस आय वॉन्ट टू गिव्ह यु वन नोट. यु हॅव पेपर ?आणि असं म्हणत त्यांनी त्यांच्या खिशामध्ये हात घालून शंभर रुपयांची नोट काढली. ती अरायव्हल हॉल मधील एका खांबावर धरली आणि त्याच्यावर माझं नाव लिहून खाली सही केली आणि मला दिली. आणि हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट होतं. (मी ती नोट लॅमिनेट करून ठेवलेली आहे) ते आपली बॅग येईपर्यंत बॅगेज बेल्ट च्या तिथे उभे राहत असत. कस्टम्स विभागाचे ऑफिसर त्यांना विनंती करत असत की तुम्ही केबिनमध्ये येऊन बसा. परंतु टाटा साहेब कधीच कस्टम्स ऑफिसरच्या केबिनमध्ये जाऊन बसलेले मी तरी पाहिलेले नाहीत.
ते आपली बॅग येईपर्यंत ट्रॉलीला हात लावून उभे राहत असत त्यांचा स्वीय सहाय्यक मिस्टर जो प्रोटोकॉल होता तो कायम त्यांच्या एअरपोर्टच्या ड्युटीज करीत असे. टाटा साहेब आपली बॅग क्लिअर न करता कधीच एअरपोर्टच्या बाहेर गेले नाहीत. मी पाहिलेले आहेत की खूप सेलिब्रिटीज त्यांच्या पी एस ला सांगून जातात आणि स्वतः एकटे निघून जातात. आपली बॅग येईपर्यंत टाटा साहेब पॅसेंजर साठी जे बेंचेस आहेत त्यावर बसायचे आणि ते बसलेले बघून खूप लोडर्स किंवा ड्युटी फ्री मधील कर्मचारी मला रिक्वेस्ट करायचे की टाटा साहेबां बरोबर एक फोटो काढायचा आहे. मी टाटा साहेबांना सांगायचे आणि टाटा साहेब कधीच कोणाला फोटो काढण्यासाठी नाही म्हणालेले नाहीत, मग तो लोडर असो, स्लीपर असो ड्युटी फ्री मधले कर्मचारी असो. कधीच त्यांनी नाही म्हटलेले नाही . इतक्या उत्तुंग शिखरावरचा माणूस इतका साधा कसा असू शकतो याचेच आश्चर्य वाटतं. मी एअर इंडिया मधून रिटायर झाले आणि एअरपोर्टवरच क्रिस्टल एव्हिएशन मध्ये काम करू लागले.
तिथेही मला व्हीआयपी हँडल करायची ड्युटी असायची त्यामुळे माझा वावर एअरपोर्टवर कधी आरायव्हल हॉलमध्ये कधी डिपार्चर ला असायचा. रतन टाटा साहेब मला नावाने ओळखायचे आणि मी अरायव्हल हॉलमध्ये असतांना ते आले. मी एअर इंडिया मधून निवृत्त झाल्यामुळे युनिफॉर्म मध्ये नव्हते आणि टाटांचे माझ्याकडे लक्ष गेले आणि ते मला म्हणाले oh you are not in uniform Today, I could not recognise you . मी म्हणाले नो युनिफॉर्म because I m retired sir. आणि ते स्माईल करून म्हणाले आय एम ऑल्सो रिटायर्ड लाईक यू. . रतन टाटा साहेबांकडून खूप काही शिकायला मिळाले. कितीही मोठे झालो तरी जमिनीवर पाय कसे ठेवायचे ते त्यांच्याकडून शिकायला मिळालं.
रतन टाटा यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन !
– सौ. मीना नाईक, बोरीवली (पूर्व) मुंबई.
(लेखिका या एअर इंडिया मधील सेवानिवृत्त अधिकारी
आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)