नियमांच्या उल्लंघनाबद्दल आरबीआयची कारवाई
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रला भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 1 कोटी 27 लाख 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पेनल्टी लोन सिस्टम ऑफर डिलिवरी ऑफ बँक क्रेडिट, सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क आणि केवायसी बाबत जारी केलेल्या नियमांचे बँकेने पालन न केल्यामुळे आरबीआयने हा दंड ठोठावला आहे.
रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन अॅक्ट 1949 अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रला 1,27,20,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने सांगितले की, 31 मार्च 2023 पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती तपासली गेली आणि मे 2023 पर्यंत बँकेच्या माहिती तंत्रज्ञानाचीही तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, बँकेने आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचे आढळून आले. यानंतर आरबीआयने बँकेला नोटीस बजावून बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल बँकेला जास्तीत जास्त दंड का लावू नये, अशी विचारणा केली. अखेर नियामकांचे पालन न केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलेय.