सरकारने घेतलेले निर्णय १४ कोटी जनतेपर्यंत पोहचविण्याचा संकल्प करा – चंद्रशेखर बावनकुळे

0

नागपूर :  देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने घेतलेले निर्णय १४ कोटी जनतेपर्यंत पोहचविण्याचा संकल्प करा, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर- अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयातुन श्री. बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

सर्वप्रथम श्री. बावनकुळे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा देत भाजप पक्षाला शून्यातून मोठे करण्यासाठी प्रयत्न केलेल्या जेष्ठ मान्यवरांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, आज पक्षाच्या १ लाख कार्यकर्त्यांनी राज्यात १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणी केली आहे. यानिमित्ताने १ लाख सक्रीय सदस्य झाले आहेत. मात्र, केवळ सदस्य करून चालणार नाही तर राज्यात पुढील काळात मोठे परिवर्तन घडवायचे आहे. यासाठी आपल्या पक्षाला सरकारसोबत जोडून राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान द्यायचे आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. या संकल्पना आपल्याला पुढे न्यायच्या आहेत. फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय राज्यातील १४ कोटी जनतेपर्यंत पोहचवून जनतेच्या विकासासाठी आपण संकल्पित झालो पाहिजे. पुढच्या १५ वर्षात भाजप आणि महायुती राज्यात भक्कमपणे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता नेत्यांच्या निवडणुका आटोपल्या. पुढे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष आणि सरपंच आपलाच राहील यासाठी कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी भाजपचे नागपूर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी नगराध्यक्ष महादुला राजेश रंगारी, कोराडीचे सरपंच नरेंद्र धानोले, नागपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अनुराधाताई अमिन, तालुका अध्यक्ष उमेश रडके, भाजप कोराडी अध्यक्ष लोकेश वरोकर, भाजप महादुला शहर अध्यक्ष प्रीतम लोहसारवा, नागपूर जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, महादुला नगरपंचायत च्या माजी नगराध्यक्ष कांचन कुथे, अरविंद खोबे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech