गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा…..
मुंबई – अनंत नलावडे
विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाच्या मुंबई मंडळाला प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येत असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.त्याचवेळी मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृती प्रक्रियेलाही येत्या १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद प्रामुख्याने सुलभ आणि पारदर्शक राहावा,याच उद्देशाने म्हाडातर्फे निर्माण करण्यात आलेल्या शुभंकर चिन्हाचे अनावरणही सावे यांच्या हस्ते आज म्हाडा मुख्यालयात करण्यात आले.त्यानंतर बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
नवीन आणि मागील सोडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला गृहसाठा म्हणून प्राप्त झाल्या असून यातील अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २५ टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २० टक्क्यांनी,मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १५ टक्क्यांनी आणि उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचेही सावे यांनी सांगितले.
यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर,मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर,मुख्य अभियंता-२ धीरजकुमार पंदिरकर,मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे,सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ आणि नियोजनकार पी.डी.साळुंखे,सहमुख्य अधिकारी उमेश वाघ,कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल अंकलगी आदी उपस्थित होते.