पुणे – डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. संपाचा आज पाचवा दिवस होता. ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामध्ये आता एमबीबीएस पदवीच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आहे. यामुळे ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेला मोठा फटका बसला आहे. रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांची संख्या कमी होण्यासोबत शस्त्रक्रियांची संख्याही कमी झाली आहे.
या संपात बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. याचबरोबर शहरातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरही सहभागी झाले आहेत. यामुळे एकूणच वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न सर्व रुग्णालयांत रुग्णसेवेला मोठा फटका बसू लागला आहे. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे बाह्यरुग्ण विभागासह इतर सेवांवर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक विभागातील सेवा सुरळीतपणे सुरू आहे. याचबरोबर अत्यावश्यक शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे सुरू आहेत. रुग्णसेवेसाठी महाविद्यालयातील शिक्षकांची मदत घेतली जात आहे. असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले .