विधानसभेच्या दोन आमदारांचे राजीनामे, आणखी चार आमदार राजीनामा देणार!

0

मुंबई – लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेले 48 खासदार आता दिल्ली दरबारी आपला आवाज बुलंद करणार आहेत. 18 व्या लोकसभा निवडणुकीत मराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर, महायुतीचे 17 उमेदवार विजयी झाले आहे. सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला असून काँग्रेसला आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. त्यामुळे, आता नवनिर्वाचित 48 खासदार संसदेत जाणार आहेत. मात्र, या 48 खासदारांमध्ये 7 विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, या सर्वच आमदारांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यापैकी, 2 विधानसभा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील 4 ते 5 महिन्यात होणार आहे. त्यामुळे, सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांचा फोकस विधानसभेकडे आहे. त्यातच, नवनिर्वाचित खासदार बनलेल्या आमदारांनी आता आपला राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. दोन विधानसभा आमदारांनी पदाचा राजीनामा दिला असून आणखी 4 आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. राज्यातील 7 विद्यमान आमदारांना खासदार झाल्यामुळे 20 जूनपर्यंत आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व बळवंत वानखेडे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्री संदीपान भुमरे यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, हे उर्वरीत 5 आमदारही लवकरच राजीनामा देतील, असे दिसून येते.

राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये सोलापूर दक्षिणच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाल्या आहेत. तर, बळवंत वानखेडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते, त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून 19731 मतांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, हे दोन्ही आमदार आता खासदार बनून दिल्लीत जात आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech