वेद ज्ञानाचा खजिना आणि विश्वाचे मूळ – सरसंघचालक

0

नवी दिल्ली – वेद हे भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञानाचा खजिना आणि संपूर्ण विश्वाचे मूळ आहे. ते संपूर्ण जगाला जोडण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. श्रीपाद दामोदर सातवळेकर लिखीत वेदांच्या हिंदी भाषांतराच्या तिसऱ्या आवृत्तीचे दिल्लीच्या आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये बुधवारी प्रकाशन झाले. यावेळी सरसंघचालक बोलत होते.याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, वेदांच्या मंत्रांमध्ये अंकगणित, घन आणि घनमूळ ही तत्त्वेही स्पष्टपणे सांगितलेली आहेत. वेदांमध्ये संपूर्ण जगाच्या कल्याणाची चर्चा आहे. वेद जगातील सर्व मानवतेच्या एकतेचा मार्ग दाखवतात. सनातन संस्कृतीत जीवन जगण्यासाठी स्पर्धा करण्याची गरज नाही, हे वेदांनी आपल्याला शिकवले आहे. ‘सत्यम् ज्ञानम् अनंतम् ब्रह्म’ अशा दृष्टीकोनातून आपल्या ऋषीमुनींनी जगाच्या कल्याणासाठी वेदांची रचना केली होती. आपल्या देशात मुलाचे पोट भरले की आई तृप्त होते. विज्ञान यावर विश्वास ठेवणार नाही पण हा भौतिकवादाच्या पलीकडचा आनंद आहे. वेदांचा आधार सर्व ज्ञान प्रणालींमध्ये दिसून येतो. वेदांच्या अभ्यासाने संपूर्ण मानवजात ज्ञानाने प्रकाशित होत राहील असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

यावेळी महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज म्हणाले की, परदेशी आक्रमकांनी वेद आणि सनातन गुरुकुल नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्या ऋषीमुनींच्या स्मृतीत ठसलेले वेद नष्ट करू शकले नाहीत. म्हणूनच भारतीय संस्कृतीत वेद शाश्वत आहेत आणि राहतील. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक आणि केंद्रीय व्यवस्थापन समितीचे सदस्य दिनेश चंद्र यांनी सांगितले की, श्रीपाद सातवळेकरांनी अनुवादित केलेल्या 4 वेदांच्या 10 खंडातील 8 हजार पानेस्वाध्याय मंडळ पारडी, गुजरात आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या वेद अभ्यास केंद्राने प्रकाशित केली आहेत. नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी, दिल्लीने ते प्रकाशित करण्यासाठी 10 वर्षे अथक परिश्रम घेतले. या उदात्त कार्यात गुंतलेल्या अभ्यासकांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला संघ परिवारातील विचारवंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech