पुणे – महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरात तंजावरचे मराठे या पुस्तक प्रकाशन पू.सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाजी राजे भोसले छत्रपती, महाराणी गायत्री राजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात उपस्थित होते.
‘जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे तर वसुधैव कुटुंबकम हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राचीनिर्मिती झाली आहे’, असा विश्वास डॉ. भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, “सत्ययुगापासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यंत धर्म हीच आपली शाश्वत प्रेरणा राहीली आहे. स्वतःला कॉंग्रेसमधील डावे म्हणणारे सुभाषचंद्र बोस तर याला स्पष्टपणे हिंदू प्रेरणा म्हणत. हिंदू म्हणजे मुस्लिम विरोध नाही तर स्वभावाचे वर्णन आहे. सर्व विविधतांना स्विकारणारे हे उदात्त विशेषण आहे.” भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भाने तंजावरचा अधिक अभ्यास व्हायला हवा, असे मत लेखक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर यांनी व्यक्त केले. साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी प्रास्ताविक केले. हिंदवी राष्ट्रीय प्रेरणा या ग्रंथ प्रकल्पाचे यावेळी उद्घाटन झाले.