नागपूर : भारतात न्यायपालिका आणि विधायीका यात काही मुद्यांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, सुप्रीम कोर्टाने देखील संसदेचा आदर केला पाहिजे असे आठवले म्हणाले. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. निशिकांत दुबे म्हणाले होते की, ‘या देशात होणाऱ्या सर्व गृहयुद्धांसाठी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत. जर सर्वोच्च न्यायालय कायदा करणार असेल, तर संसद भवन बंद केले पाहिजे,’ असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपला धारेवर धरले आहे.
भाजप खासदाराच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सारवासारव केली. आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो. निशिकांत दुबे यांचे वक्तव्य त्यांचे वैयक्तिक असून, पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे नड्डांनी म्हटले होते. यापार्श्वभूमीवर सोमवारी नागपूर दौऱ्यावर असलेले आठवले पत्रकार परिषदेत म्हणाले की, प्रत्येकाने न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे. न्यायपालिका जे काही आदेश देईल, ते पाळलेच पाहिजेत. पण न्यायव्यवस्थेने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, संसद सर्वोच्च आहे. कायदे करणे हे संसदेचे काम आहे. कायद्यानुसार निर्णय देणे हे न्यायव्यवस्थेचे काम आहे. संसदेने बनवलेल्या प्रत्येक कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य करणे योग्य नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, सर्वोच्च न्यायालयानेही संसदेचा आदर केला पाहिजे असे आठवले यांनी सांगितले.
वक्फ कायद्यावर आठवले म्हणाले की, सुधारित वक्फ कायदा हा मुस्लिमांच्या हिताचा असून विरोधक याचे राजकीय भांडवल करीत आहेत. विरोधक मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत आहेत. संसदने कायदा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या चौकटी राहून निर्णय घेणे अपेक्षित आहे. शेवटी संसद हीच सुप्रीम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका या पारदर्शक झाल्या नसल्याचे वक्तव्य विदेशात केले. यावर आठवले म्हणाले की, राहूल गांधी यांनी विदेशात जाऊन भारतच्या विरोधात बोलू नये. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घ्यायचे नसेल तर घेऊ नये, परंतु देश बदलत असल्याची प्रशंसा करावी असा आठवले यांनी सांगितले.