मुंबई – अलिबाग येथील प्रसिद्ध चित्रकार निलेश पाटील व रमेश जुईकर यांनी साकारलेल्या कोकणातील निसर्गरम्य चित्रांचे प्रदर्शन “मृदगंध” हया शीर्षकांतर्गत मुंबईत काळा घोडा येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीच्या हिरजी गॅलरीत भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. ८ ते १४ एप्रिल, २०२४ हया दरम्यान ११ ते ७ हया वेळेत कलाप्रेमींना पाहता येणार आहे.
चित्रकार रमेश जुईकर, मु. शहाबाज चौकीचा पाडा, अलिबाग व चित्रकार निलेश पाटील, मु. ढवर, अलिबाग येथील रहिवाशी असून त्यांनी चित्रकलेचे व्यावसायिक शिक्षण मुंबई येथून पूर्ण करून याच क्षेत्रात आपल्या मूळ गावी रोजगार प्राप्त केला. लहानपणापासूनच निसर्गाची व चित्र रेखाटण्याची आवड असल्याने चित्र रेखाटण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. यातूनच पुढे निसर्ग चित्र रेखाटण्यास सुरुवात झाली. यापूर्वी या चित्रकारांची मुंबई, पुणे व इतर ठिकाणी चित्र प्रदर्शन झाली असून त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तसेच भारतात व परदेशात त्यांच्या चित्रांची विक्री झाली आहे.
सदर चित्र प्रदर्शनात रसिकांना कोकणातील मंदिरे, मातीची कौलारू घरे, शेती, मासेमारी नौका, समुद्र किनारे, नारळी पोफळीच्या बागा अशी अनेक निसर्गरम्य चित्रे या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत. अॅलक्रिलिक, ऑईल, सॉफ्ट पेस्टल व जलरंग माध्यमात केलेली कॅनव्हास व पेपरवरील ही चित्रे कोकणातील निसर्ग, संस्कृती, लोकजीवन व तेथील पारंपारिक व्यवसाय यांचे दर्शन घडवितात. कोकणातील मातीचा गंध असलेले हे चित्र प्रदर्शन दि. ८ ते १४ एप्रिल, 2024 पर्यंत ११ ते ७ या वेळेत जहांगीर आर्ट गॅलरी ‘हिरजी’ पहिला मजला, काळाघोडा, मुंबई येथे सर्वांसाठी खुले राहील.