राज्यपालांच्या हस्ते ५० युवा नादस्वरम वादकांना शिष्यवृत्ती प्रदान

0

प्रसिद्ध नादस्वरम वादक शेषमपट्टी शिवलिंगम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

मुंबई – राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते देशातील ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. श्री षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभेने षण्मुखानंद सभागृह येथे रविवारी (दि. १) आयोजित केलेल्या ‘नादस्वर उत्सव’ या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते युवा व होतकरू नादस्वरम वादकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. सभेतर्फे ही शिष्यवृत्ती तीन वर्षे देण्यात येणार आहे. इलेक्‍ट्रॉनिक स्वरवाद्यांच्या वाढत्या प्रसारामुळे नादस्वरम हे ध्वनी वाद्य हळुहळू विलुप्त होत आहे. या वाद्याच्या जतनासाठी सभेतर्फे ५० नादस्वर कलाकारांना चक्रवर्ती टी एन राजा रथिनम पिल्लई फेलोशिप देण्यात येते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी श्री टी शिवलिंगम यांना श्री षण्मुखानंद नादस्वरम चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अडीच लाख रुपये रोख, सुवर्ण लेपित कांस्याचा दिवा, नादस्वरम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाला षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष डॉ व्ही शंकर, उपाध्यक्ष डॉ व्ही रंगराज, शेषमपट्टी श्री टी. शिवलिंगम आणि श्रीराम फायनान्सचे उपाध्यक्ष उमेश रेवणकर उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech