श्रीनगरमध्ये सर्वात कमी आणि रियासीत सर्वाधिक मतदानाची नोंद
जम्मू – जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज, बुधवारी 26 जागांवर मतदान झाले. यात संध्याकाळपर्यंत सुमारे 55 टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यात श्रीनगर येथे सर्वात कमी 27.37 टक्के मतदान झाले. तर रियासी येथे सर्वाधिक 71.81 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. निवडणूक आयोगानुसार दुसऱ्या टप्प्यात 239 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 233 पुरुष आणि 6 महिला आहेत.
जम्मू-काश्मिरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी राज्याच्या 6 जिल्ह्यांतील 26 जागांसाठी मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.11 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे 8 टक्के कमी मतदान झाले. मात्र, अंतिम आकडेवारी येणे बाकी असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात 25.78 लाख मतदार 26 जागांवर 239 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलेले अनेक भाग संवेदनशील होते. या टप्प्यात समाविष्ट काश्मीरमधील बहुतांश जागांवर फुटीरतावाद्यांचा प्रभाव दिसून आला आहे. यामध्ये खानयार, जदीबल, लाल चौक, ईदगाह, हजरतबल आदींचा समावेश आहे. हे लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीत सुरक्षेकडे निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेऊन होते. ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी 3 टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी 24 जागांसाठी मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात 26 जागांसाठी आणि शेवटच्या टप्प्यात उर्वरित 40 जागांसाठी 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर 8 ऑक्टोबरला मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.