नवी दिल्ली : गुजरातच्या गोध्रा घटनेतील साक्षीदारांची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. याप्रकरणी एसआयटीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाशी संबंधीत १४ साक्षीदारांच्या सुरक्षेत सीआयएसएफचे १५० जवान तैनात होते. यासंदर्भातील माहितीनुसार एसआयटीने १० नोव्हेंबर २०२३ रोजी गोध्रा प्रकरणातील १४ साक्षीदारांची सुरक्षा काढून टाकण्याचा अहवाल दिला होता. यामध्ये हबीब रसूल सय्यद, मीना हबीब रसूल सय्यद, अकिला यासिनमीन, सय्यद युसूफ, अब्दुल मरियम अप्पा, याकुब नूरन निशार, रजाक अख्तर हुसेन, नाझीम सत्तार, माजिद शेख यानुश महमद, हाजी मयुद्दीन, समसुद्दीन फरीदाबानू, समसुद्दीन मुस्तफा इस्माइल, मदिनाबीबी मुस्तफा, -भाईलाल चंदुभाई राठवा यांचा समावेश आहे. गुजरातच्या गोध्रा येथे २७ फेब्रुवारी २००२ रोजी अयोध्येहून साबरमती एक्स्प्रेसने परतणाऱ्या ५८ हिंदू बांधवांना जाळून मारण्यात आले होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यात सुमारे १०४४ लोक ठार झाले होते.