निफाड – सत्ता असली तर सर्वच सोबत असतात. मात्र सत्ता गेली तरी सोबत राहणारे सहकारी कायम आठवणीत राहतात. त्यामुळे राजकीय उभारी मिळते. त्यामुळे अशा लोकांची आठवण ही कायम राहते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
माजी आमदार मालोजी मोगल यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी शरद पवार नाशिक दौऱ्यावरती आले होते. यावेळी आपल्या भाषणात सांगितले की, संकटाच्या काळात जे मदतीला थांबतात तेच आठवणीत राहतात. कारण ते संकटात साथ देतात. सत्ता असल्यानंतर तर सगळेच थांबतात, पण ती गेल्यानंंतर आधार देणारे व परत उभारी साठी साथ देणार्यांपैकी मालोजीराव मोगल होते. 35 आमदार त्यावेळी मला सोडून गेले. नाशिक जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम बघितले व 14 आमदारांंची फौज नाशिक जिल्ह्यातून माझ्या पाठीमागे उभी केली. ती उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी राजकारण करतांंना समाजकारणावर जोर देत निसाका व मविप्र सारख्या संस्था चालवितांना संस्थांचा विचार केला, व संस्था पुढे कशा जातील हाच उद्देश राजकारण व समाजकारण करतांना ठेवत शेतकरी केंद्रबिंदू ठेवून आपल्या कर्तृत्वाने ते सर्वांच्या लक्षात राहिले. ते आज आपल्यात नाही, पण त्यांच्या विचाराने व कार्याने मोगलांच्या नवीन पिढीचे नेतृत्व राजेंद्र मोगल पुढे नेत आहे. स्व. मालोजीराव मोगलांचे राहिलेले काम पुढे नेण्यासाठी राजेंद्र मोगलांना जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात करत निफाडकरांना साद घातली.