बदलापूर घटनेमुळे देशात महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का बसला 

0

पुणे – बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पवार यांच्यासह मविआतील घटक पक्षांच्या नेत्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर भर पावसात आंदोलन करण्यात आलं. यावेळी एकीकडे सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला असताना शरद पवारांनी उपस्थितांना महिला सुरक्षेची शपथ दिली. बदलापूरला बालिकेवर जो अत्याचार झाला, त्यामुळे सबंध देशात महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का बसला असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे. पण त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही.

बदलापूरचा प्रकार झाल्याचा निषेध होत असताना आणखी काही ठिकाणी अशाच दुर्दैवी घटना घडल्या असल्याचेही ते म्हणाले. पवार म्हणाले, एक दिवस महाराष्ट्रात असा जात नाही. कुठे ना कुठे भगिनींवरच्या अत्याचाराची बातमी वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्रपतींचं आहे. त्यांनी आपल्या राजवटीत एका महिलेवर अत्याचार झाल्याची तक्रार आल्यानंतर त्या आरोपीचे हात कलम करण्याची शिक्षा दिली होती. आजच्या स्थितीत जे घडलं त्याची गांभीर्यानं नोंद सरकारनं घेतली पाहिजे. संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचं दु:ख होतंय की राज्यकर्ते, राज्याचे प्रमुख आणि त्यांचे काही सहकारी म्हणतायत की बदलापूरच्या प्रकरणात विरोधक राजकारण आणतायत. मुलीबाळींवरील अत्याचाराबाबत कुणी आवाज उठवला तर त्याला राजकारण म्हणायचं हा निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत, भगिनींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech