आभारपत्रात शरद पवारांची पंतप्रधानांकडे मागणी
मुंबई : दिल्लीच्या तालकटोरा मैदानात बाजीराव पेशवे (प्रथम) महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पुतळे बसवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपस्थित राहिल्याबद्दल पवारांनी पंतप्रधानांना आभाराचे पत्र पाठवले असून त्यामध्ये उपरोक्त मागणी केली आहे. अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल आणि पंतप्रधानांनी केलेल्या भाषणासाठी आभार व्यक्त करताना पवार म्हणाले की, दिल्लीतील तालकटोरा मैदान येथे बाजीराव पेशवा पहिले, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांसाठी दिल्ली सरकारला निर्देश देण्याची विनंती शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकाच मंचावर होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे शरद पवार असल्याने त्यांनी पंतप्रधानांनी या संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे पत्रातून आभार मानले. तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले, असा उल्लेख शरद पवार यांनी आपल्या पत्रात केला आहे.
या साहित्य संमेलनाच्या मंचावरून दिल्लीतील तालकटोरा मैदानावर बाजीराव पेशवे पहिले, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या सरहद या संस्थेने हा प्रस्ताव मांडला होता. अनेक साहित्यिकांची ही मागणी असल्याचे यावेळी समोर आले आहे. वास्तविक पूर्ण आकाराचे घोडेस्वार पुतळे उभारले जावेत, अशी साहित्यिकांची मागणी आहे. मात्र हे मैदान नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसवण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या या दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेकडून घ्यावा लागणार आहेत. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली सरकार आणि नवी दिल्ली महानगरपालिकेला योग्य निर्देश देण्याची विनंती पत्रातून केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अर्धाकृती पुतळे बसवले जावे, अशी मागणी केली होती. अनेक साहित्यिकांनी या संदर्भातील मागणी केली असल्याचे शिंदे यांनी म्हटले होते.