उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी दिला मोलाचा सल्ला
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. काड्या घालणारे, भांडणे लावणारे, अतिमहत्वाकांक्षी लोक निघून गेले आहेत. शिवसेनेच्या शाखा म्हणजे न्याय मंदिरे असून या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. कार्यालये सुरु ठेवतांना कार्य लई करा, कार्याचा लय होऊ देऊ नका, अशा परखड शब्दांत शिवसेना उपनेते श्री. विश्वनाथ नेरुरकर यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दहिसर, बोरीवली, मागाठाणे विभागातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक १४ मधील नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शिवसेना शाखा क्रमांक १४ येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी माजी नगरसेवक, मुंबई म्हाडाचे माजी सभापती, शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर हे बोलत होते. ते पुढे म्हणाले, “शिवसेना ही चार अक्षरे म्हणजे एक कुटुंब असून कुटुंबातील सर्वांनी एकत्रित रहा, एकत्रित काम करा. निवडणुका येतील आणि जातील पण पक्ष मजबुतीने लोकांसाठी कार्यरत राहील असे कार्य करा. एकमेकांना सांभाळून रुसवेफुगवे बाजूला सारून आपला पवित्र भगवा झेंडा फडकवत ठेवा. एकमेकांच्या चुका जाहीर पणे दाखविण्याऐवजी आपापसात सांगून गैरसमज दूर होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”. राजा खोपकर यांनी आपल्याला शिवसेनेत आणले असल्याचे सांगून विश्वनाथ नेरुरकर यांनी माजी शाखाप्रमुख प्रताप रात यांना अभिलाष कोंडविलकर यांच्या नेमणुकीचा आनंद झाला असता, असे आवर्जून सांगितले. माजी नगरसेवक बाळ राणे, माजी शाखाप्रमुख राजा खोपकर आदींनी नवीन शाखाप्रमुख अभिलाष कोंडविलकर, उपविभाग प्रमुख चेतन कदम, रेखा बोऱ्हाडे, रोहिणी चौगुले, सिमिंतिनी नारकर, स्नेहल वैद्य, संजय जोजन, अमित गायकवाड आदींचे अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मनोज कोळवणकर, विलास (काका) शिंदे, वसंत सावंत, दिनेश विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी शाखाप्रमुख संदेश नारकर यांनी सूत्रसंचालन केले.