उद्धवजी आदाणींकडून निधी घेतला की नाही….?

0

शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचा उद्धव ठाकरेंना परखड सवाल….

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मलिदा खाण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उबाठाची उठाठेव सुरु असून धारावी पुनर्वसनला विरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत,अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते माजी खासदार संजय निरुपम यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावे की त्यांनी अदानींकडून निधी घेतला की नाही? असाही परखड सवाल निरुपम यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले की,जानेवारी २०१९ मध्ये महायुतीचे सरकार असताना धारावी पुनर्विकासाच्या संदर्भातील अदानींचे टेंडर मागे पडून सेकलींक कंपनीला टेंडर मिळालं होते.मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे सेकलींकने यातून माघार घेतली होती.मात्र त्यानंतर २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने सेकलिंकचे टेंडर रद्द केले आणि अदानींना वाट मोकळी करून दिली होती.मग त्यावेळी कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला होता, याचेही उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे.कारण शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांचे सलोख्याचे असलेले संबंध पूर्ण भारताला माहित आहेत, मग त्यांचा तुमच्यावर दबाव होता का,असाही रोखठोक प्रश्न निरुपम यांनी विचारला.

महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासंदर्भात टेंडर मसुदा मविआ प्रमाणेच कायम ठेवला त्यात काहीही वेगळे नियम लावण्यात आले नाहीत.अटी व शर्ती सुद्धा त्याच आहेत, मग विरोध का? त्यामूळे उध्दव ठाकरे हे आता केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी पालुपद लावत असल्याची टीकाही निरुपम यांनी केली.

धारावीतल्या झोपडीधारकांच्या भल्यासाठीच पात्र आणि अपात्र लोकांना सरसकट घरे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून या निर्णयामुळे जळफळाट झालेल्या उध्दव ठाकरे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धारावी पुनर्विकासाच्या संदर्भात आंदोलन केले होते.मात्र त्यानंतर आता जुलै महिन्यात त्यांनी पुन्हा हा विषय उचलून धरला आहे. मग गेले सहा महिने उद्धवजी का गप्प होते? आता पुन्हा निवडणुकीकरिता देणग्या मिळवण्यासाठी तुमची उठाठेव चालली आहे का? अशी खरमरीत व बोचरी टीकाही निरुपम यांनी केली.त्याचवेळी उद्धव ठाकरे हे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याने त्यांनी हिंदुत्व कधीच सोडले असून मुस्लिम तुष्टीकरण करत आहेत,असाही घणाघात निरुपम यांनी केला.

निरुपम म्हणाले की, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच, धारावीतल्या झोपडीधारकांच्या स्वप्नांचा चुराडा करण्यासाठी ठाकरे स्वार्थी राजकारण करत आहे.आता ते टीडीआरचा बागुलबुवा करत आहे.मात्र डेव्हलपमेंट प्लॅन नुसारच टीडीआर वापरण्यात येणार असल्याने जमीन सरकारचीच असणार आहे.अदानी समूह केवळ विकासकाच्या भूमिकेत असल्याने उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावे की अदाणींकडून पैसे घेतले की नाही, हे जाहीर करावे असे आव्हानही निरुपम यांनी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech