नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. चार दिवसांपूर्वी अमित शहा रायगडवर आले आणि त्यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले की, ’शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते सीमित ठेऊ नका. पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सुरत लुटली, त्यावेळी त्याची बातमीही लंडन गॅझेटमध्ये छापून आली होती. त्यामुळे अमित शाहांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये. भाजपला शिवाजी महाराजांबद्दल एवढंच वाटत असेल, तर त्यांनी शिवजयंतीला देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, असे आव्हानही शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.
नाशिक शहरातील मनोहर गार्डन लॉन्स येथे शिवसेना ठाकरे गटाचे एक दिवसीय विभागीय निर्धार शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. तर शिबिराचा समारोप उद्धव ठाकरेंच्या भाषणाने झाला. यावेळी बोलतांना त्यांनी नाशिकमध्ये निर्धार मेळावा होऊ नये, म्हणून दंगल घडवली, असे म्हणत विविध विषयांवरून महायुतीला लक्ष्य केले. ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांनी माझ्यामागे तुमच्यासारखी पुण्याई उभी केली याचा मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आपण असून, महाराष्ट्रात दिशा आपण ठरवू कुणी गद्दार ठरवू शकत नाही. महाराष्ट्रात कुणाची मस्ती खपवून घेतली जाणार नाही. आमची मुंबई लुटली जात असून गुजरातला सगळं नेलं जात आहे, हे आम्ही सहन करणार नाही. नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने आम्हालाही वाटलं होतं की स्मारक होईल. मात्र, पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे शिवरायांचे भव्य स्मारक राज्यपाल भावनाच्या जागेवर उभे करा. शिवाजी महाराजांपेक्षा मोठे कोणीच असू शकत नाही.
आम्ही वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केला. कारण त्याचा हिंदुंशी कोणताही संबंध नव्हता. वक्फ बोर्डच्या विधेयकाला तामिळनाडूच्या अण्णा द्रमुकने विरोध केला. पण दोनच दिवसात अमित शाहा तामिळनाडूत गेले आणि त्यांनी त्यांच्याशी युती केली. कारण तिकडे स्टॅलिन त्यांच्या बोकांडी बसला आहे. भाजपवाले चंद्राबाबू, नितीश कुमार, मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत बसले होते. यांचे हिंदुत्व बुरसटलेले आहे. शेतात बैल लघु शंका करायला जातो तसे वाकडे नका जाऊ, सरळ जा. आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक कापून आलो नाही.
शिवसेनेने हिंदुत्व सोडलं अशी बोंब मारणाऱ्या भाजपला सांगतो की, मी तुम्हाला सोडले हिंदुत्व सोडलेले नाही. शिवसेना नसती तर तुम्ही आयोध्येपर्यंत पोहोचू शकले नसते. भाजपने बिहारमध्ये ‘सौगात ए मोदी’च्या माध्यमातून ३२ लाख मुस्लिमांना भेटीचे वाटप केले. त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेले होते? म्हणजे महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे आणि बिहारमध्ये बाटेंगे तो जितेंगे असे यांचे धोरण आहे. मी मुख्यमंत्री असताना कसलाही भेदभाव केला नाही. मी केलेल्या कामांमुळे मुस्लिम लोक माझ्यासोबत आले आणि हे घाबरले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं अशी बोंब मारणाऱ्या भाजपने बिहारमध्ये ‘सौगात ए मोदी’च्या माध्यमातून ३२ लाख मुस्लिमांना भेटीचं वाटप केलं. त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे आणि बिहारमध्ये बाटेंगे तो जितेंगे असं यांचं धोरण आहे. मी मुख्यमंत्री असताना कसलाही भेदभाव केला नाही. मी केलेल्या कामांमुळे मुस्लिम लोक माझ्यासोबत आले आणि हे घाबरले. भारतीय जनता पक्ष हा फेक नरेटीव्हवाला पक्ष आहे, असेही ठाकरे म्हणाले. बिहारमध्ये यांनी नितीश कुमार यांच्यासोबत हे गेले. आंध्रमध्ये चंद्राबाबूसोबत हे गेले. त्यामुळे आम्ही भाजपला सोडलं आहे, हिंदुत्वाला नाही.