पर्यटकांच्या सेवेसाठी एसटीची शिवनेरी धावली

0

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर परिसरात राज्यातील विविध भागातील पर्यटक खोळंबले होते. त्यांना विशेष विमानाने सुखरूपपणे मुंबईत आणून मुंबईहुन पुढील प्रवासासाठी वातानुकूलित शिवनेरी पाठवण्याचे नियोजन एसटी ने केले आहे. पर्यटकांना धीर देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक विमानतळावर उपस्थित होते. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पर्यटकांचे विशेष विमान मुंबई विमानतळावर (टर्मिनल -1) येथे दाखल झाले. पहिल्या विमानामध्ये १७५ पर्यटक आणि दुसऱ्या विमानात ७७ पर्यटक आहेत. मुंबईहुन त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या पर्यटकांसाठी ८ शिवनेरी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार अडकलेले २५२ पर्यटकांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केले. पर्यटकांना धीर देत मुंबईहुन पुढील प्रवासासाठी त्यांनी माहिती दिली. प्रवासादरम्यान सर्व पर्यटकांची चहा नाश्त्याची आणि जेवणाची सोय करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधितांना दिल्या एसटी महामंडळाने केलेल्या मदतीसाठी पर्यटकांनी धन्यवाद दिले. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्याचे पालन एसटी महामंडळ सातत्याने करत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवासी वाहतूक विना अडथळा पूर्ण करण्याचे काम एसटी चालक वरिष्ठाच्या मार्गदर्शनाने सातत्याने करत आहेत. करोना काळात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणणे, अतितीव्र पावसामुळे रेल्वे वाहतूक खोळंबल्यानंतर शहरातून उपनगरात प्रवासी वाहतुकीची जबाबदारी महामंडळाने सुरक्षितपणे पूर्ण केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech