रामटेक – अठराव्या लोकसभा निवडणुकीचे जाहीर झाले असून महायुतीला राज्यात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. महायुतीतील भाजपाने 09, शिवसेना शिंदे गटाने 07 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आलेला आहे. राज्यातील मिळालेल्या अपशानंतर आता महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. कामठीतून महायुतीच्या उमेदवाराला कमी मतं मिळाली ही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनुकळे यांची जबाबदारी आहे. बावनकुळेच विलन आहेत. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे कारवाईची मागणी करणार अशी मागणी करणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे.
कृपाल तुमाने म्हणाले की, रामटेक ही जागा शिवसेनेकडे राहिली नाही याचं मला दु:ख आहे. मी दोन वेळा रामटेचं प्रतिनिधित्व केलं आणि मोठ्या फरकाने निवडून आलो होतो. मुकुल वासनिकसारख्या काँग्रेसच्या तगड्या नेत्याला मी दोनवेळा मोठ्या फरकाने हरवलं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत कामठीतून महायुतीच्या उमेदवाराला कमी मतं मिळण्यामागे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनुकळे यांची जबाबदारी आहे. पराभवाचे विलन बावनकुळेच आहेत. त्यांनी यासाठी राजीनामा दिलाच पाहिजे. याप्रकरणी मी भाजपाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याकडे कारवाई मागणी करणार असल्याचेही कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे.
बावनकुळेंवर आरोप करताना कृपाल तुमाने म्हणाले की, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी कोणता सर्वे केला हे मला माहिती नाही. मात्र त्यांनी हट्ट धरला होता की ही जागा मला मिळायला नको. त्यांनी एकनाथ शिंदेंवर दबाव टाकला होता की ही जागा इतर कुणाला द्या. ज्यांचा विधानसभेमधे परफॉर्मन्स चांगला नाही, त्यांच्यावर कारवाई करू, असे ते म्हणाले होते. त्यांच्या हट्टामुळे कामठीमधून महायुतीच्या उमेदवाराला सगळ्यात कमी मतं मिळाली आहेत. त्यामुळे आता बावनकुळे काय कारवाई करतात हे पाहावं लागेल, असेही तुमाने म्हणाले.
कृपाल तुमाने म्हणाले की, बावनकुळे यांनी अमित शाह यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला, त्यामुळे मला तिकीट नाकारण्यात आलं. आम्ही 42 उमेदवारांना निवडणून आणण्याची जबबादारी घेतो, मात्र तुमानेंना तिकिट मिळालं तर आम्ही 41 उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतो, असं बावनकुळे यांनी अमित शाह यांना सांगितलं असल्याचं मला समजलं आहे. पण मला पक्षाच्या सर्वेक्षणात 76 टक्के लोकांनी पसंती दिली होती आणि राजू पारवेंना केवळ 1 टक्के लोकांनी पसंती दर्शविली होती, अशी माहितीही कृपाल तुमाने यांनी दिली.