नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान..! – मुख्यमंत्री

0

मुंबई – पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले आहे. महिला नेमबाज मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावून या स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे. नेमबाज मनु भाकरची ही कामगिरी तमाम देशवासियांसाठी सार्थ अभिमानाची असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिला स्पर्धेसाठी तसेच नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नेमबाज मनू भाकरचे अभिनंदन – अजित पवार

“फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे. मनू भाकर हिने जिंकलेले कांस्यपदक ही देशासाठी चांगली सुरुवात असून या यशाने देशवासीयांच्या आशा अधिक उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने मनू भाकर हीचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात भारतीय खेळाडू अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असा मला विश्वास आहे.

ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकणारी मनु भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे, हे सुद्धा या पदकाचे वैशिष्ट्य.. मनू भाकर हिचे पुन:श्च अभिनंदन. भारतीय ऑलिम्पिक पदकाला अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी मनापासून शुभेच्छा…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला स्पर्धेतील पहिले पदक जिंकून देणाऱ्या कांस्यपदक विजेत्या नेमबाज मनू भाकर हिचे अभिनंदन केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech