अहमदाबाद- गुजरात उच्च न्यायालयाने आज भाजपाचे माजी खासदार दिनू सोळंकी आणि इतर सहा जणांना निर्दोष सोडले. यात गीर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल बहाद्दूरसिंह वादेर याचाही समावेश आहे. 20 जुलै 2010 रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांची गुजरात न्यायालयाच्या प्रवेशद्वारात हत्या झाली. या खटल्यात सर्व आरोपींना निर्दोष सोडताना उच्च न्यायालयाने धक्कादायक वक्तव्य करीत म्हटले की, या प्रकरणाचा तपास ही सुरुवातीपासून धूळफेक होती. पोलीस आणि कनिष्ठ न्यायालयाने सत्य नष्ट केले. सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही यासाठीच सर्व प्रयत्न झाले आणि त्यात त्यांना यश आले. आरटीआय कार्यकर्त्याची हत्या झाली आणि त्याचा हल्लेखोर सापडलाच नाही अशी अनेक प्रकरणे आहेत. त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. सुपेहिया आणि विमल के. व्यास यांच्या खंडपीठाने या खटल्याचा निकाल देताना आज नमूद केले की, हा खटला ‘सत्यमेव जयते’च्या विरोधातील म्हणून लक्षात ठेवला जाईल. हे भयानक आणि तितकेच आश्चर्यकारक आहे की, हल्लेखोरांना अटक केली गेली नाही आणि हत्या केल्यानंतर त्यांना अहमदाबाद शहराच्या बाहेर पळता आले. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास सुरुवातीपासूनच चुकीचा आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे दिसून आले आहे. साक्षीदारांचा विश्वास संपादन करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला आहे. कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविण्याच्या पूर्वग्रहीत धारणांनुसार पुराव्याचे विश्लेषण केले आहे. कनिष्ठ न्यायालयाने कायदा त्याच्या प्रवृत्तीनुसार नव्हे, तर लिखित स्वरूपात लागू करणे बंधनकारक होते. त्यांनी तसे केले नाही. सर्व तपास चुकीच्या पध्दतीने झाला.
माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांनी गुजरातच्या गीर जंगलाजवळ सुरू असलेल्या बेकायदा खाणकाम विरोधात दाद मागितली आणि त्यानंतर काही दिवसात त्यांची 20 जुलै 2010 रोजी गुजरात उच्च न्यायालयासमोरील बार कौन्सिलच्या इमारतीबाहेर दोन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास अहमदाबादच्या गुन्हे शाखेने केला होता. या शाखेने सहा आरोपींविरुद्ध दोन आरोपपत्रे दाखल केली होती. त्यात सोळंकी यांचा पुतण्या शिवा सोलंकी आणि शार्प शूटर शैलेश पंड्या यांचा समावेश होता. त्यांना अटकही करण्यात आली होती. नंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली. त्यामुळे जेठवा यांच्या वडिलांनी 2012 मध्ये गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेनंतर या प्रकरणी सीबीआयला तपास करण्याचे निर्देश देण्यात आले. 2013 मध्ये सीबीआय आरोपपत्रात भाजपा नेते दिनू सोळंकी याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून नमूद केले होते.