सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाजाला ३० किलो चांदीचा वापर करून मढविण्यात आले आहे. यासाठी सुमारे ३३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. नांदेड येथील भाविक अरगुलवार परिवारातर्फे दरवाजाला चांदी बसवून देण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. भाविक शंकर दिगंबर अरगुलवार व नरसिमलू दिगंबर अरगुलवार यांनी कै. दिगंबर तुकाराम अरगुलवार व कै. जनाबाई दिगंबर अरगुलवार आई-वडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम मोफत करून दिले आहे. अरगुलवार हे भाविक श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे निस्सीम भक्त आहेत. नियमित दर्शनासाठी येत असतात. ते बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहेत.